एफआरपी रक्कम कोणत्याही कपाती वीना दिवाळीपूर्वी मिळावी - दत्ता फुंदे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : शेवगाव, नेवासा पाथर्डी तालुक्यातील साखर कारखान्यांनी त्यांना गेल्या वर्षीच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामात ऊस देणाऱ्या ऊस उत्पादकांना दहा टक्काच्या पुढील साखर उताऱ्याची एफआरपी रक्कम कोणत्याही प्रकारची कपात न करता दिवाळी पूर्वी देण्याची मागणी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता  फुंदे यांनी केली आहे.

     या संदर्भात त्यांनी परिसरातील साखर कारखान्यासह साखर संचालनालय, साखर उपायुक्त  अहमदनगर यांच्याकडे  निवेदने दिली आहेत. शासनाने मागील वर्षीच्या गळीत हंगामापासून एफआरपीच्या दहा टक्के रक्कम संबधित ऊस उत्पादकांचा ऊस तुटल्यानंतर १४ व्या दिवसाच्या आत संबधितांना अदा करण्याचा व त्यानंतर दहा टक्क्याच्या पुढील रक्कम संबधित कारखान्याच्या अंतिम साखर उतारा व उपपदार्थापासून मिळणाऱ्या लाभाची रक्कम जी काही होईल ती पुढील हंगामाच्या सुरुवातीला अदा करण्याचा दंडक जाहीर केला आहे.

      आता यंदाचा गळीत हंगाम दि.१५ ऑक्टोंबरच्या दरम्यान दिवाळीच्या आसपास सुरु होणार असल्याने संबधित कारखान्यांनी संबंधित ऊस उत्पादक शेतक-यांना अंतिम साखर उताऱ्याची फरक रक्कम दिवाळी पूर्वी कोणत्याही प्रकारची कपात न करता  अदा करून परिसरातील ऊस उप्तादक शेतक-यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी  निवेदनात केली आहे.

      फुंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुक्यातील पदाधिकारी, सदस्य व काही ऊस उत्पादक शेतक-यांसमवेत जिल्ह्याचे साखर सह संचालक मिलिंद भालेराव यांची नुकतीच भेट घेवून मागणीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. 

Comments

Popular posts from this blog

श्रीक्षेत्र चासनळी ते पैठण पायी दिंडी सोहळा

सालवडगावच्या उपसरपंचपदी राजेंद्र औटी बिनविरोध

डॉ. होमी भाभा वैज्ञानिक स्पर्धेत आत्मा मालीकच्या विवेक निकमची गगणभरारी